प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 03:43 PM2024-11-25T15:43:07+5:302024-11-25T15:45:39+5:30
Nana Patole News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला फक्त १६ जागा जिंकता आल्या.
Nana Patol Maharashtra Election 2024 News: शंभराहून अधिक जागा लढवणाऱ्या काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला समोरं जावं लागलं. दिग्गज नेते पराभूत झाले. प्रदेशाध्यक्ष अवघ्या २०८ मतांनी निवडून आले. त्यामुळे काँग्रेसला जबर झटका बसला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नाना पटोले दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले आहेत. दरम्यान, ते राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यावर आता नाना पटोले यांनीच खुलासा केला आहे.
विधानसभा निवडणुकीत १०५ उमेदवार उतरवलेल्या काँग्रेसला अवघ्या १६ जागांवर विजय मिळवता आला. विदर्भात काँग्रेसला यशाची आशा होती. पण, त्यांचे स्वप्न भंगले. अनेक वरिष्ठ नेतेच पराभूत झाले. तर काही काठावर विजयी झाले. या निकालानंतर आता काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
नाना पटोले दिल्लीत
काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. ते दिल्ली जाताच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. नाना पटोले पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी चालवले.
यावर दिल्लीत माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी मौन सोडलं. राजीनामा देणार असल्याची चर्चा होत आहे, असे नाना पटोले यांना विचारण्यात आले. ते म्हणाले, "तुम्हाला कोणी सांगितलं? मी आता अध्यक्षांना भेटायला चाललो आहे. आतापर्यंत राजीनामा दिलाच नाही. तुम्हाला कोणी सांगितलं?", असा उलट प्रश्न उपस्थित करत नाना पटोलेंनी उत्तर दिले.
VIDEO | "I am going to meet Congress president Mallikarjun Kharge, I have not given my resignation," says Maharashtra Congress president Nana Patole (@NANA_PATOLE) on reports of his resignation as state Congress chief.
— Press Trust of India (@PTI_News) November 25, 2024
(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/dFwBh8fn2k
काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनेक मोठे नेते पराभूत झाले आहेत. पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक मोठे नेते पराभूत झाले आहेत. काँग्रेसने सर्वाधिक जागा विदर्भात लढवल्या होत्या, तिथेच काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे.