“मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर खुर्ची खाली करा, आम्ही ते देऊ”; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 10:52 AM2023-09-02T10:52:58+5:302023-09-02T10:54:17+5:30
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे, असा दावा करण्यात आला आहे.
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुरु असलेले आंदोलन पोलीसी बळाचा वापर करुन दडपण्याचा प्रयत्न येड्याचे सरकार करत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करुन हवेत गोळाबार केला, या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. मराठा समाजाला जर शिंदे, फडणवीस, पवार यांचे तिघाडी सरकार आरक्षण देऊ शकत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात आम्ही आरक्षण देऊ असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजप, देवेंद्र फडणवीस व मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळेच मराठा समाज आजही आरक्षणापासून वंचित आहे. काँग्रेस आघाडी सरकारने दिलेले मराठा आरक्षण फडणवीस सरकारला कोर्टात टिकवता आले नाही. पुन्हा फडणवीस सरकारने मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तोही कोर्टात टिकला नाही. मुळात भाजपला आरक्षण द्यायचेच नाही म्हणून ते चालढकल करत आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केली.
दीड वर्ष झाले आरक्षणावर चकार शब्द काढलेला नाही
मविआचे सरकार असताना हेच फडणवीस मराठा समाजाला फक्त मीच आरक्षण देऊ शकतो अशी राणा भिमदेवी थाटात घोषणा करत होते पण दीड वर्ष झाले आरक्षणावर चकार शब्द काढलेला नाही. फडणवीस व भाजपा खोटारडे आहेत, त्यांनी मराठा, धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे, असा दावा नाना पटोलेंनी केला.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाचा गुंता वाढवण्यास फडणवीस व मोदी सरकारच जबाबदार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ५० टक्क्यांची मर्यादा काढण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल पण केंद्रातील भाजपाचे सरकार त्यासाठी काहीच हालचाल करत नाही. राज्यात सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षातील कोणाचीही मोदींसमोर बोलण्याची हिम्मत नाही त्यामुळे केवळ समिती, बैठका व चर्चेचे गाजर दाखवून चालढकल केली जात आहे. आजच्या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे असेही नाना पटोले म्हणाले.