“गौतम अदानी हे पवारांच्या घरी रहायला गेले तरी त्याचे काही नाही, पण...”; काँग्रेसची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 02:30 PM2023-06-02T14:30:20+5:302023-06-02T14:33:14+5:30
Nana Patole on Gautam Adani-Sharad Pawar Meet: ते कोणाला भेटतात हा आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न नाही, असा टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे.
Nana Patole on Gautam Adani-Sharad Pawar Meet: एकीकडे काँग्रेसने हिंडेनबर्ग अहवालावरून अदानी समूहावर प्रश्नांची सरबत्ती करत हल्लाबोल केला असून, दुसरीकडे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. याबाबत काँग्रेसकडून खोचक प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली, याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, कोण कोणाला भेटतो याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. अदानी पवारांच्या घरी रहायला गेले तरी आम्हाला त्याचे काही नाही. ते कोणाला भेटतात हा आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न नाही, अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली.
अदानी व काँग्रेसची वयैक्तिक वैर नाही
अदानी व काँग्रेसची वयैक्तिक वैर नाही. आमचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे आहेत. मोदी-अदानी यांचा संबंध काय? आणि अदानीच्या कंपनीत २० हजार कोटी रुपये कुठून आले? सर्व कंपन्या अदानीलाच काय विकल्या जात आहेत? अदानी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी ही काँग्रेसची मागणी कायम आहे. मोदी सरकार ही मागणी मान्य का करत नाही? हा जनतेच्या पैशाचा प्रश्न आहे म्हणून काँग्रेस जाब विचारत राहणार, कोणाला व्यक्तिगत संबंध ठेवायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यातील ही बैठक तब्बल अर्धा तास चालली होती. शरद पवारांनी ही बैठक टेक्निकल असल्याचे सांगत विषय टाळला असला तरी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात यामुळे चर्चांना उधाण आले आहे. याआधी हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकरणात गौतम अदानी यांची बाजू घेतली होती.