“केंद्र सरकारची धोरणे, योजना मित्रों व अदानी ठरवतात, पराभवाच्या भीतीपोटी टीका”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 07:04 PM2023-09-26T19:04:23+5:302023-09-26T19:05:18+5:30

Maharashtra Politics: पराभवाच्या भितीपोटी नैराश्येतून काँग्रेसवर पातळी सोडून टीका करण्यात येत असल्याचा पलटवार नाना पटोले यांनी केला.

nana patole replied bjp pm narendra modi criticism on congress | “केंद्र सरकारची धोरणे, योजना मित्रों व अदानी ठरवतात, पराभवाच्या भीतीपोटी टीका”: नाना पटोले

“केंद्र सरकारची धोरणे, योजना मित्रों व अदानी ठरवतात, पराभवाच्या भीतीपोटी टीका”: नाना पटोले

googlenewsNext

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना सर्व पातळी सोडली आहे.काँग्रेस पक्ष नक्षलवादी चालवतात हा मोदींचा आरोप बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे तसेच पंतप्रधानपदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. मोदींनी याआधी दलितांना नक्षलवादी म्हटले, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशातील शेतकऱ्यांनाही आतंकवादी, खलिस्तानी, नक्षलवादी म्हणून अपमानित केले होते. ८० कोटी अन्नदात्यांनी मोदींनी पंतप्रधान केले ते नक्षलवादी असतील तर मग नरेंद्र मोदी हे नक्षलवादी आहेत का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसचा ठेका काही अर्बन नक्षलवाद्यांकडे आहे, काँग्रेसमध्ये अर्बन नक्षलवाद्यांचे चालते, असा आरोप करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार करायला हवा होता. आपण भारतीय जनता पक्षाचे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक नाही तर देशातील १४० कोटी जनतेचे पंतप्रधान म्हणून बोलत आहोत याची जाण त्यांना असायला हवी. लोकशाही व्यवस्थेत विरोधकांवर टीका करणे अभिप्रेत आहे पण ती करताना काही ताळतंत्र हवे, विशेषतः पंतप्रधान पदावरील व्यक्तीने तर बोलताना विचार करुन अभ्यासपूर्ण बोलले पाहिजे. परंतु नरेंद्र मोदी हे विरोधकांना शत्रू समजून काहीही बोलत असतात. पंतप्रधान पदावरील मोदींनी सांभाळून बोलावे हीच अपेक्षा आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

देशातील जनता खोट्या बोलण्याला फसणारी नाही

काँग्रेस पक्ष कोण चालवतो, काँग्रेसची धोरणे कोण आखतो हे मोदींनी सांगण्याची गरज नाही ते देशातील जनतेला माहित आहे. पण केंद्रातील मोदींचे सरकार मात्र मित्रोंसाठी काम करते व अदानीला देश विकून त्यांच्या फायद्यासाठी देशातील जनतेला रस्त्यावर आणले आहे हे जनतेला माहित आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपा पराभूत होत असून केंद्रातील सरकारचाही दारूण पराभव होत असल्याची भिती नरेंद्र मोदींना सतावत आहे. सत्ता जाणार या नैराश्येतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलत आहेत पण देशातील जनता आता नरेंद्र मोदींच्या खोट्या बोलण्याला फसणारी नाही हे मोदी व भाजपाने लक्षात ठेवावे, असेही नाना पटोले म्हणाले.
 

Web Title: nana patole replied bjp pm narendra modi criticism on congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.