Maharashtra Politics: “स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, इतरांची काळजी करु नये”; काँग्रेसची ठाकरे गटावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 01:08 PM2022-11-05T13:08:20+5:302022-11-05T13:09:16+5:30
Maharashtra News: सत्तेत असून आपला पक्ष ज्यांना नीट सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांच्या पक्षाबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असा पलटवार नाना पटोले यांनी ठाकरे गटावर केला.
Maharashtra Politics: राज्यातील अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मात्र, यातच आता शिवसेनेच्या ठाकरे गटातील एका नेत्याने केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून, अंतर्गत धुसपूस वाढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिंदे गटातील नेत्याच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पलटवार केला आहे. ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करु नये, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
शिवेसना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाण्याबाबत विधान केले होते. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते. हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे. फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे ते सध्या शांत आहेत, असा मोठा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. यानंतर नाना पटोले यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
दुसऱ्यांच्या पक्षाची काळजी करण्याची गरज नाही
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत. त्यांना दुसऱ्यांच्या पक्षाबाबत बोलायचे काही कारण नाही. सत्तेत असून आपला पक्ष ज्यांना नीट सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांच्या पक्षाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पक्षात पाहावे, या शब्दांत नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, तोडोवाल्यांचा जोडोशी काय संबंध? त्यांच्याबद्दल फारसे बोलणे योग्य नाही. भारत जोडो यात्रेचा परिणाम उलटा पाहायला मिळत असल्याची टीका भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. यावर बोलताना, राज्यामध्ये हुकूमशाहीचे सरकार आहे. लोकशाहीला न मानणारे सरकार आहे. त्यामुळे भारत तोडो सरकारला हे कळणार नाही. भारत जोडो यात्रेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे नाना पटोले म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"