काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस असून विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या वाढदिवशी नाना पटोले यांनी एक मोठी घोषणा केली आहे. दोन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था तयार करुन महाराष्ट्रातील एक कोटी तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प काँग्रेसनं केला आहे. हाच संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असं नाना पटोले यांनी आपल्या वाढदिवशी जाहीर केलं आहे.
"दोन दिवसांपूर्वी शिर्डी येथे काँग्रेसनं नवसंकल्प अधिवेशन घेतलं. या अधिवेशनाच्या माध्यमातून जी भूमिका घेतली ती जनतेपर्यंत पोहोचवणं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आमचे संकल्प पूर्ण करून घेणार असल्याचं ठरलं आहे. महाराष्ट्रात दोन ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी तयार करत एक कोटी तरुणांना रोजगार देणार असा आमचा संकल्प आहे. काँग्रेसचा हाच संकल्प पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचा माझ्या वाढदिवसानिमित्त संकल्प करत आहे", असं नाना पटोले म्हणाले.
"शेतकरी हा दोन्ही हातांनी देणारा असतो. पण केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मागणाऱ्यांच्या भूमिकेत नेऊन ठेवलं आहे. महाराष्ट्रात दोन ट्रिलियनची इकोनॉमी तयार केली तर शेतकऱ्यांना ताठ मानेनं जगता येईल. तसंच रोजगारही वाढेल. राज्यातील तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होतील. केंद्रानं देशात फक्त जाती-धर्मात द्वेष निर्माण केला आहे. पण केंद्राचा डाव आम्ही चालू देणार नाही", असंही पटोले म्हणाले.