Maharashtra Politics: आगामी राज्यभरातील महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. यातच आता महाराष्ट्र हा काँग्रेसचा आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
शरद पवार यांनी १९९९ साली काँग्रेसमधून बाहेर पडत नवीन पक्ष स्थापन केला. पण, काँग्रेस पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार पुण्यातील कार्यालयात गेले होते. तेव्हा शरद पवार यांनी सांगितले की, काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही. काँग्रेसला संपवायला अनेकजण निघाले होते. ती संपली तरच आपण जिवंत राहू ही कुरघोडी सातत्याने चालते. पण, त्यांनाही मान्य करावं लागलं, काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे. राहुल गांधींच्या यात्रेनंतर लोकांचं समर्थन पुन्हा काँग्रेसला मिळत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसकडे एकनाथ शिंदेंपेक्षा ताकदीचे नेते, पण...
महाराष्ट्र हा काँग्रेसचा आहे. आम्ही आमचे लोक संभाळले नाहीत. त्यामुळे एकामागून एक नेते, कार्यकर्ते पक्षाबाहेर गेले. या व्यवस्थेला बदलण्याचे काम आपल्याला करायचे आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची स्वबळावर सत्ता येऊ शकते. काँग्रेसकडे आर्थिक, शारीरिक सर्व सक्षम लोक आहेत. मात्र, कुठे कमी पडतो हेच कळत नाही. नवी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत काँग्रेसला माननारा वर्ग आहे. येथे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही ताकदीची नेते आहेत. फक्त आपल्याकडे खोके आणि धोकेवाली लोक नाहीत, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
दरम्यान, राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजपाने करोडो रुपये खर्च केले पण जनता या अपप्रचाराला बळी पडली नाही. भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी यांचे नेतृत्व व खरी ओळख जनतेला झाली. मुंबई व आसपासच्या परिसरातही काँग्रेस संघटन वाढवून जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काँग्रेस पक्षाचा शिपाई म्हणून काम करा. लोकांना जोडायचे असेल तर संवाद वाढवला पाहिजे, एक परिवार म्हणून प्रत्येकाला सोबत घेऊन जाऊ आणि अखिल भारतीय काँग्रसने दिलेले हाथ से हाथ जोडो अभियान महाराष्ट्रात यशस्वीपणे करून दाखवू, असे नाना पटोले म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"