Nana Patole News: भाजप आपल्या देवीदेवतांचा वापर फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठी करत असतो आणि निवडणुका होताच याच देवांचा अपमान करतो. कर्नाटकात भाजपाला भगवान श्रीराम व बजरंगबली यांनीच जागा दाखवून दिली. महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करुन कर्नाटकपेक्षा मोठा विजय मिळवू, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आदिपुरुष चित्रपटात भगवान श्रीराम व हनुमानाचा अपमान केला आहे. पंढपूरात जागोजागी पोस्टर लावले आहेत त्यातही पांडुरगांचा अपमान केला आहे. हे सरकार आपल्या दैवतांचा अपमान करत आहे, जनतेचा अपमान करत आहे.पांडुरंगाचा अपमान करणारे बोर्ड तातडीने काढून टाका, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.
महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प
छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आला, आरक्षण संपवले. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे नाना पटोले यांनी नमूद केले.
दरम्यान, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू. जत भागातील पाणी प्रश्नावर कर्नाटक सरकार मदत करणार असल्याचे आश्वासन दिले त्याबद्दल आभारी आहोत पण सीमाभागातील लोकांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन थोरात यांनी केले.