मुंबई : ओबीसी प्रवर्गाची 2021 मध्ये जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने केली जात आहे. तर यासाठी राज्यभरातील अनेक ओबीसी संघटना सतत केंद्र सरकारकडे पाठपुरवठा करत आहे. तर ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झाली नाही तर जनगणनेवर बहिष्कार टाका, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
यवतमाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पटोले म्हणाले की, तत्कालीन गृहमंत्री यांनी लोकसभेत येणाऱ्या जनगणना जातीनिहाय करण्याची घोषणा केली होती. परंतु सध्याची जनगणना ही जुन्याच पद्धतीने होणार असे दिसत आहे. त्यामुळे 2021 ची जनगणना जातीनिहाय झाली नाही तर जनगणनेवर बहिष्कार टाका असे आवाहन पटोले यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेत ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव एकमताने मंजूर करून घेतला असला तरी हि वेळ केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याची आहे. जनगणनेत जर ओबीसींचा कॉलम समाविष्ट करण्यात नाही आला तर ओबीसी समाजाने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी लागेल असेही पटोले म्हणाले.
तर देशात बहुसंख्येने असलेल्या ओबीसींची जनगणना व्हावी हि अत्यंत रास्त मागणी आहे. त्याशिवाय या समाजघटकाला योग्य न्याय मिळणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ओबीसी कॉलम समाविष्ट करावा यासाठी सर्वस्तरातून दबाव निर्माण झाला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.