Nana Patole: "मविआत बिघाडी व्हावी असा काही लोकांचा प्रयत्न, पण..."; मतभेदांवर नाना पटोले स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 09:03 PM2023-06-02T21:03:35+5:302023-06-02T21:04:50+5:30
Nana Patole: महाविकास आघाडीत बिघाडी व्हावी असा काही जणांचा प्रयत्न सुरु आहे पण तसे काहीही होणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवणार आहोत, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
मुंबई - महाविकास आघाडीत बिघाडी व्हावी असा काही जणांचा प्रयत्न सुरु आहे पण तसे काहीही होणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवणार आहोत. राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकुल असे वातावरण आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची मते अजमावून घेतली जात आहेत. दोन दिवसाच्या या बैठकीनंतर लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्याचे दौरे केले जातील, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज सिंधुदुर्ग रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, भंडारा गोदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. उर्वरित मतदारसंघाचा आढावा उद्या शनिवारी घेतला जाणार आहे.
बैठकीनंतर टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, निवडणुका केव्हाही लागल्या तरी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यादृष्टीने आढावा बैठकीत स्थानिक नेत्यांकडून माहिती घेतली जात आहे. विदर्भासह राज्यात विविध भागात काँग्रेसला मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरे जात आहेत. भाजपाला जो पराभूत करु शकेल त्यालाच उमेदवारी दिला जावी असा एकंदर सुर आहे. मविआने एकास एक उमेदवार दिला तर भाजपाचे पानिपत करणे सोपे जाईल. भाजपाच्या हुकुमशाही, मनमानी व अत्याचारी सरकारला जनता कंटाळली आहे. जनतेला बदल हवा आहे, देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून यावेळी राज्यात व दिल्लीतही बदल होईल हे चित्र आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी व्हावी असा काही जणांचा प्रयत्न सुरु आहे पण तसे काहीही होणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवणार आहोत. काँग्रेस पक्ष मतदारसंघाचा आढावा घेत आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होऊन जागा निश्चित होतील. परंतु देशात सध्या असलेल्या ज्वलंत प्रश्नावरून भाजपा लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे पण जनता आता भाजपाच्या भुलथापांना बळी पडणार नाही. शेतकऱ्यांच्या घरात अजून कापूस पडून आहे. शेतमालाला भाव नाही, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. मागील निवडणुकीत भाजपा व नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण करु शकले नाहीत त्यावर जनतेत तीव्र नाराजी आहे. जनतेच्या प्रश्न घेऊन निवडणुका लढवू असेही नाना पटोले म्हणाले.