मुंबई : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या मराठीत अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (Congress) महिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यावरून नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली असून आपल्या कार्यकर्त्यांना आवरा, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात निदर्शने करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण निंदनीय आहे. प्रभू श्रीराम आणि हनुमानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी सीतेविषयी देखील आदर निर्माण करणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून या घटनेकडे गंभीरतेने सर्व पक्षांनी पाहणे अतिशय आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घालून आपल्या कार्यकर्त्यांना लगाम घालावी, असा इशारा नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. तसेच, या घटनेची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील नाना पटोलेंनी केली आहे.
दरम्यान, काल पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या मराठीत अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात आंदोलन करत स्मृती इराणी यांचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन सुरु झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घटनास्थळी येत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.