अंबरनाथ: काँग्रेस हा कधीही न संपणारा पक्ष आहे. काँग्रेस वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी करण्यामागे केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच हेतू होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरून काम करू नये. आघाडी आणि महाआघाडीच्या गोंधळात काँग्रेसची ताकद कमी होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.जनजागरण अभियानांतर्गत अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची पदयात्रा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ शहरात फॉरेस्ट नाका ते इंदिरा भवनपर्यंत पटोले यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. उलन चाळ ते कोहजगावपर्यंत पटोले यांनी पदयात्रा काढली. ब्लॉक काॅंग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यकर्ता मेळाव्यात पाटोळे यांनी केंद्र सरकारवर टीका करून त्यांच्या धोरणांची खिल्ली उडवली. देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना आपल्याच पंतप्रधानांवर विश्वास राहिलेला नाही. शेतकरीविरोधातील कायदा मागे घेतला तरी पंतप्रधान आपला शब्द फिरवतील या भावनेतून शेतकरी अजूनही आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे पटोले म्हणाले.
‘भाजप सरकारी उद्याेग विकण्याच्या तयारीत’काँग्रेसच्या काळात नवीन उद्योग आणि सरकारी कंपन्या उभारण्याचे काम केले. आता भाजप सरकारच्या काळात सरकारी कारखाने आणि उद्योग विकण्याच्या तयारीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळापर्यंतच्या पंतप्रधानांनी देश बलवान करण्याचे काम केले. मात्र, मोदी सरकारने देश विकायला काढला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, प्रभारी कॅप्टन नीलेश पेंढारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.