शिर्डी: काँग्रेसमधील नेत्यांची पक्षावरील नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येत आहे. यातच अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पक्षाच्या अडचणीत वाढ झालेली दिसत आहे. यातच आता राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण ते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्यापर्यंत अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वपक्षीयांनाच खडेबोल सुनावले आहेत.
इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेची उमेदवारी मिळताच राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तसेच तरुण नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून आशिष देशमुख यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शिर्डीत काँग्रेसचे दोन दिवसीय चिंतनशिबिर १ व २ जून रोजी संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील नाराजी चिंतेचा विषय असल्याचे सांगितले जात आहे.
आशिष देशमुख नेहमी हायकमांडच्या आदेशाला आव्हान देतात
आशिष देशमुख यांच्या नाराजी आणि राजीनाम्याबद्दल विचारले असता नाना पटोले म्हणाले की, आम्ही ज्या क्षेत्रात आहोत त्याला राजकारण म्हणतात आणि राजकारणात या सगळ्या गोष्टी चालत राहतात. लोक प्रवाहात असतात आणि जातातही. यापूर्वीही अनेकदा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, आशिष देशमुख नेहमी हायकमांडच्या आदेशाला आव्हान देतात. अशा पद्धतीने वारंवार आव्हान देणे बरोबर नाही. आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निर्णयाला कुणी आव्हान देत असेल तर तो स्वतःला मोठा समजतोय. तरीही देशमुखांना पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न करू, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, अनेक कर्तृत्ववान नेते असूनही पक्षाने येथील नेत्यांचा विचार केला नाही. मला राज्यसभेचे आश्वासन देऊनही पक्षाने ते पूर्ण केले नाही, अशी खंत आशिष देशमुख यांनी बोलून दाखवली. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.