नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका करत खासदारकी पक्षाला सोडचिठ्ठी देणारे नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे वृत्त. ते 11 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये राहुल गांधींसोबत एका सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, पटोले यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट मोहन प्रकाश यांची भेट घेतल्याने पटोले यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला बळ मिळाले आहे. दरम्यान, खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पटोले यांचे रात्री नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. "आता मी मोकळा झालो आहे. 11 डिसेंबरला गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत एका सभेमध्ये सहभागी होणार असून, त्या सभेला संबोधित करणार आहे. तसेच भाजपाच्या खोटारडेपणा जनतेसमोर मांडणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. पटोले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करत आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते. मे २०१४ ते मे २०१७ मध्ये भाजपामध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना मे महिन्यातच दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या-त्या राज्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत पटोलेंच्या शेतकरी व ओबीसी प्रश्नावर मोदींनी हाताने इशारा करीत पटोलेंना बसायला लावले होते, तेव्हापासून नाना पटोले हे मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज होते.
नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर? अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या सभेत सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 11:03 PM