नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
By योगेश पांडे | Published: September 22, 2024 11:26 PM2024-09-22T23:26:27+5:302024-09-22T23:27:26+5:30
विधानसभा निवडणुकीत विदर्भातून कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील व पटोले हेच मुख्यमंत्री बनतील, अशीच भूमिका कॉंग्रेसच्या नेत्यांनी मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीतून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत असताना नागपुरातील कॉंग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच पुढील मुख्यमंत्री असेल, असा दावा केला आहे. रविवारी नागपुरात शहरातील सहाही विधानसभा जागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बहुतांश नेत्यांचा हाच सूर होता. विधानसभा निवडणुकीत विदर्भातून कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील व पटोले हेच मुख्यमंत्री बनतील, अशीच भूमिका कॉंग्रेसच्या नेत्यांनी मांडली.
रविवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विदर्भाचे सहप्रभारी कुणाल चौधरी, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. नितीन राऊत, आ. अभिजीत वंजारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अतुल कोटेचा, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार प्रामुख्याने उपस्थित होते. कुणाल चौधरी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत महायुतीचा पराभव करण्याचे आवाहन केले. सद्य:स्थितीत पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा रंगल्या आहेत. मात्र, नाना पटोले यांनी लोकसभेत कॉंग्रेसला मोठे यश मिळवून दिले होते. विधानसभेत ते राज्यात करिष्मा करतीलच. मात्र, विदर्भात सर्वात जास्त जागा जिंकून देतील व तेच मुख्यमंत्री असतील, असा विश्वास कॉंग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी व्यक्त केला. अतुल लोंढे, अभिजीत वंजारी, अनिस अहमद यांनी हा मुद्दा मांडला व नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांनीदेखील याला दुजोरा दिला. दरम्यान, अद्याप महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला नसला, तरी नागपुरातील सहाही जागांवर कॉंग्रेसचेच उमेदवार लढतील, असादेखील नेत्यांचा सूर होता. अतुल कोटेचा यांनी यावेळी स्वागत भाषण केले.
संथ काम करणाऱ्यांचा होणार हिशेब
विकास ठाकरे यांनी यावेळी लोकसभेत संथ काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जाहीर इशाराच दिला. लोकसभेत कॉंग्रेसला चांगली मते मिळाली. परंतु, काही पदाधिकाऱ्यांचे काम फारच संथ झाले होते. त्यांची यादीच पक्षाने तयार केली आहे. विधानसभेतदेखील त्यांनी संथपणा दाखविला, तर मनपाच्या निवडणुकीत त्यांचा हिशेब करू, असे ठाकरे म्हणाले.
पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार
२०१९ साली निवडणूक लढलेले पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके व गिरीश पांडव यांनी यावेळी त्यांची भूमिका मांडली. ते तिकिटासाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे राहू व त्यांना जिंकून आणू, असे आम्ही आश्वस्त करतो, असे तिघांनीही प्रतिपादन केले.