Nana Patole : देशाचे स्वातंत्र्य आणि संविधान अबाधित राखण्यासाठी जागरूक राहावे, नाना पटोलेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 06:41 PM2022-01-26T18:41:57+5:302022-01-26T18:54:19+5:30
Nana Patole : प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तारिक अन्वर यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आजच्याच दिवसापासून लागू झाले. संविधानाने सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, समानतेचा हक्क दिला. पण भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत. हा धोका लक्षात घेऊन देशाला मोठ्या संघर्ष व बलिदानाने मिळालेले स्वातंत्र्य व संविधान अबाधित राखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जागरुक रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तारिक अन्वर यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई, संजय राठोड, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस भा. ई. नगराळे, मुनाफ हकिम, हुस्नबानो खलिफे, संघटन सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, राणी अग्रवाल, सरचिटणीस व प्रवक्त्या भावना जैन, डॉ. राजू वाघमारे, राजेश शर्मा, प्रवक्ते अरुण सावंत, भरत सिंह, सचिव राजाराम देशमुख, झिशान सय्यद आदी उपस्थित होते.
'मागील ७ वर्षात स्वातंत्र्य धोक्यात'
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईतील आपण शिपाई आहोत. परकियांना हाकलून देऊन आपण हे स्वातंत्र्य मिळवले. काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्याबरोबर, लोकशाही व्यवस्था दिली, संविधानाने नागरिकांना हक्क दिले. हक्क मागण्याच्या प्रवृत्तीमुळेच आपला देश मागे राहिला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले त्यांचे वक्तव्य म्हणजे नागरिकांचे संवैधानिक अधिकार धोक्यात आणण्याचाच प्रकार आहे. युपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार कायदा, रोजगार हमीचा कायदा आणून देशातील नागरिकांना सक्षम करण्याचे काम केले. परंतु भाजपा काळात मात्र नागरिकांच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम केले जात आहे. केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारमुळे मागील ७ वर्षात स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. हे स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान व्यवस्था अबाधित ठेवणे आपले कर्तव्य असून त्यासाठी सदैव सजग रहा, असे नाना पटोले म्हणाले.
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अलर्ट करण्यात चुकीचे काय?'
स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारचा आमच्यावर दबाव आहे असे सांगत असतील तर संवैधानिक व्यवस्था धोक्यात आली आहे याचेच हे द्योतक आहे. मागील सात वर्षात देशातील चित्र बदलले आहे. देश धोक्यात येतोय, देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सावध रहायला हवे. कोरोना काळात काळजी घ्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आपण शाळा, बाजार, सगळे बंद केले होते. देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला जर मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला तर भाजपला त्याचा त्रास का होतो असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उपस्थित केला. तर जनतेचे मूळ प्रश्न बाजूला ठेवण्यासाठी भाजपा धर्मांधतेचे वातावरण तयार करत आहे. उद्यानाला नाव देण्याचे काम महानगरपालिकेचे आहे. मंत्री अस्लम शेख हे त्या उद्यानाचे नामकरण करायला गेले नाहीत तर त्यांच्या निधीतून या उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे त्याचे ते उद्घाटन करणार आहेत. त्या उद्यानाला टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासून आहे पण भाजपा विनाकारण त्याला धार्मिक रंग देत आहे. निधीच्या बाबतीत काँग्रेस मंत्र्यांनी जी भूमिका मांडली त्यात काहीही गैर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अलर्ट करण्यात चुकीचे काय? फडणवीस यांच्या काळात काय झालं, धिंगाणाच सुरू होता असेही पटोले म्हणाले.
देशाची एकता व अखंडता धोक्यात - तारिक अन्वर
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तारिक अन्वर यावेळी म्हणाले की, देशात १५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी संविधान दिले व त्या संविधानाच्या आधारे देशाची आजपर्यंत वाटचाल सुरु आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे परंतु हे योगदानच नाकारण्याचे काम केले जात आहे. स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग, संघर्ष व बलिदानाने स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. आज सत्तेत असलेले लोक स्वातंत्र्य चळवळीची थट्टा करत आहेत. काँग्रेसने धर्मनिरपेक्ष सरकार देऊन देश उभा केला. देशाची ही एकता व अखंडताच धोक्यात आलेली आहे. देश उभारणीतील काँग्रेसचे योगदान ओळखा व महाराष्ट्र आणि देशात काँग्रेसची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्याचा संकल्प करा, असे आवाहन तारिक अन्वर यांनी केले.