नाना पटोलेंनी त्या मोदीबाबत केलेला दावा खोटा, भंडारा पोलीस आणि ग्रामस्थांच्या स्पष्टीकरणामुळे अडचणी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 07:38 PM2022-01-18T19:38:23+5:302022-01-18T19:39:16+5:30
Nana Patole News: मोदींबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणी हळुहळू वाढताना दिसत आहेत. नानांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपाने आज दिवसभर राज्यभरात आंदोलन करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
भंडारा - मोदींबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणी हळुहळू वाढताना दिसत आहेत. नानांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपाने आज दिवसभर राज्यभरात आंदोलन करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नाही तर एका स्थानिक गावगुंडाबाबत बोललो होतो, तसेच त्याला पोलिसांनी अटक केली आहे, असा दावा नाना पटोले यांनी आज सकाळी केला होता. मात्र नाना पटोलेंचा हा दावा आता खोटा ठरण्याची शक्यता आहे. आम्ही मोदी नावाच्या कुठल्याही व्यक्तीला अटक केलेली नाही, असे पोलिसांनी सांगितल्याने या प्रकरणात नाना पटोलेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नाना पटोलेंनी केलेले विधान आणि नंतर केलेल्या दाव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच आपण दावा केलेल्या मोदी नावाच्या गावगुंडाला पोलिसांनी अटक केल्याचे नाना पटोले यांनी म्हटले होते. मात्र नानांचा दावा पोलिसांनी खोडून काढला आहे. पोलीस अधिकारी अरुण वाईकर यांनी सांगितले की, या घटनेबाबत आम्ही चौकशी करत आहोत. या चौकशीतून जो समोर येईल, त्यावरून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
दरम्यान, नाना पटोले यांनी केलेल्या दाव्याबाबत गावातील लोकांना विचारणा केली असता, त्यांनी मोदी नावाचा कुठलाही गुंड गावात नसल्याचे सांगितले. त्यामुळे नाना पटोलेंचा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे.