सातारा : भीषण दुष्काळाला कंटाळून मराठवाड्यातील अनेक शेतकरी अक्षरश: मृत्यूला कवटाळत आहेत. नाउमेद झालेल्या अशा शेतकऱ्यांना धीर देण्याचे, त्यांच्यात लढण्याची जिद्द निर्माण करण्याचे काम अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे करत आहेत. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीचा हातही देत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. अविनाश पोळ यांनी औरंगाबाद येथे नाना पाटेकर यांची भेट घेतली अन् भीषण दुष्काळतही सातारचा ‘जिगरबाज शेतकरी’ कसा जगतोय, हे पाहण्यासाठी पाटेकरांना निमंत्रण दिले.दुष्काळ निवारण आणि खचलेल्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी नेमके कोणते उपाय करावे लागतील, याविषयी नाना पाटेकर आणि पाणीतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ यांच्यात चर्चा झाली. दुष्काळ हटविण्यासाठी तात्पुरते आणि कायमस्वरूपी अशा दोन टप्प्यात उपाययोजना कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्रात सध्या ज्याठिकाणी तीव्र दुष्काळाची छाया आहे अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे आहे. तसेच ज्याठिकाणी लोकांना नेहमीच दुष्काळाचे चटके सोसावे लागतात, अशा ठिकाणी दीर्घकालीन उपाय योजने अत्यावश्यक बनले आहे. आर्थिक मदतीने किती फायदा होईल, माहीत नाही; पण खचलेल्या, नाउमेद झालेल्या शेतकऱ्यांना आधाराची गरज असल्याची भावना नाना पाटेकर यांनी यावेळी व्यक्त केली.यावर डॉ. पोळ यांनी सातारा जिल्ह्याचे उदाहरण देऊन मराठवाड्यापेक्षाही साताऱ्यातील अनेक भागात कमी पाऊस पडल्याचे पाटेकरांच्या निदर्शनास आणून दिले. फलटण तालुक्यात तर अवघा २४ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या खाईत लोटला आहे. तलाव आटलेत. विहिरी कोरड्या पडल्यात. कूपनलिकांनी तळ गाठलाय. जनावरांना चारा नाही. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. शेतजमिनी भेगाळल्यात. असे आभाळाएवढं संकट कोसळूनही इथला ‘जिगरबाज शेतकरी’ मात्र जिद्दीनं जगतोय. मिळेल तिथून हंड्याने पाणी आणून पिकं जगतोय, अशी सविस्तर माहिती देऊन डॉ. पोळ यांनी साताऱ्याच्या ‘जिगरबाज शेतकऱ्याची जगण्याची जिद्द कशी आहे, हे पाहण्यासाठी सातारला येण्याचे निमंत्रण नाना पाटेकर यांना दिले. (प्रतिनिधी) ‘लोकमत’नं वाढविली उमेददुष्काळात जीणं अवघड बनल्यानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असतानाच साताऱ्यातला शेतकरी मात्र दुष्काळाशी दोन हात करत जिद्दीनं जगतोय. ‘लोकमत’नं पंधरा दिवसांपासून ‘जिगरबाज शेतकरी’ ही मालिका सुरू केली असून ‘मरायचं नाय.. आता लढायचं हाय, जिद्द सोडू नका, संघर्ष करा,’ असा आशेचा किरण शेतकऱ्यांमध्ये मनात निर्माण केला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाना.. ‘जिगरबाज’ बघायला साताऱ्याला या!--‘लोकमत’नं वाढविली उमेद
By admin | Published: September 08, 2015 9:53 PM