ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबईत आपले स्वत:चे घर असावे अशी अनेकांची इच्छा असते. तशी ती कलाकारांचीही असते. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी लॉटरी निघते त्यावेळी सर्वसामान्यांबरोबर कलाकाराही अर्ज करतात. यावेळच्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये हेमांगी कवी आणि सुहास परांजपे या दोन अभिनेत्रींचे भाग्य खुलले आहे.
हेमांगीने म्हाडाच्या घरासाठी यापूर्वी तब्बल सातवेळा अर्ज केला होता. अखेर आठव्या प्रयत्नात तिला यश मिळाले. छोटया पडद्यावर विविध भूमिका साकारल्यानंतर हेमांगी सध्या 'ती फुलराणी' या नाटकातून आपली छाप उमटवत आहे. सुहास परांजपे झी मराठी वाहिनीवरील 'नांदा सौख्यभरे' या मालिकेतील सासूच्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यांनी रंगवलेली सासू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
मागच्यावर्षी म्हाडाच्या लॉटरीमध्ये टाईमपास फेम दगडू उर्फ प्रथमेश परब आणि अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना म्हाडाचे घर मिळाले होते. यावेळी म्हाडाच्या घरासाठी ‘राधा ही बावरी’फेम अभिनेत्री श्रुती मराठे, ‘बँडीट क्वीन’ आणि ‘वॉटर’फेम अभिनेत्री सीमा बिस्वास, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’फेम तनुज महाशब्दे यांनी अर्ज केला आहे.