Vasant Chavan : नांदेड : नांदेडचेकाँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली. त्यानंतर पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तसंच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून प्रतिनिधित्व केल्यानंतर वसंत चव्हाण यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला होता. तसंच, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्वपूर्ण होता.
खासदार होण्याआधी वसंत चव्हाण महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच, वसंत चव्हाण यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, मे २०१४ मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अॅग्रीचे अध्यक्षही होते.
वंसत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द - जन्म - 15 ऑगस्ट 1954- 1987 साली नायगाव ग्राम पंचायतीचे सरपंच , 24 वर्ष सरपंच - 1990 - जिल्हा परिषद सदस्य - 2002 विधान परिषद सदस्य ( राष्ट्रवादी ) - 2009 - विधानसभा सदस्य - अपक्ष - 2014 - विधानसभय सदस्य - काँगेस - 2024 - लोकसभा सदस्य - काँगेस
काँग्रेसचे निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड- वडेट्टीवारनांदेडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम राखणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने काँग्रेसचे निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. काँग्रेससाठी त्यांनी दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत शोक भावना व्यक्त करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.