मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण (पॅथॉलॉजी) न घेतलेल्या व्यक्ती या पॅथॉलॉजी लॅब चालवून, खुलेआम तपासणी अहवाल देत आहेत. यामुळे रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा बोगस पॅथॉलॉजी लॅबला आळा घालण्यासाठी नांदेड पॅटर्न राबवावा, असे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.राज्यात ५ हजारांहून अधिक तर मुंबईत दीड ते दोन हजार बोगस पॅथॉलॉजी लॅब सर्रासपणे सुरू आहेत. डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशन (डीएमएलटी) अथवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींना स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवण्याची परवानगी नाही. एम.डी. पॅथॉलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पॅथॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली या व्यक्ती पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करू शकतात. काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये दहावी अथवा बारावी शिकलेल्या व्यक्तीही स्वंतत्रपणे काम करत आहेत. अशा बाबी यापूर्वी अनेकदा उजेडात आल्या असून अजूनही असे प्रकार सुरुच असल्याचे पहायला मिळत आहेत.नांदेडमधील ‘आयएमए’ने एकत्र येऊन बोगस पॅथॉलॉजीविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत बोगस पॅथॉलॉजी लॅब चालवणाऱ्यांविरुद्ध पोलीस आणि बोगस वैद्यकीय व्यवसाय समितीकडे तक्रार दाखल केली जाते. यामुळे बोगस पॅथॉलॉजी लॅबना आळा बसण्यास मदत होते. त्यामुळे राज्यभरात नांदेडप्रमाणे सक्रिय मोहीम सुरू करावी, अशी मागणी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने सुरू असणाऱ्या लॅब आणि अवैध काम करणाऱ्या डॉक्टरांची तक्रार ही महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत केली जात असल्याचे, पॅथॉलॉजी संघटनेचे डॉ.अविनाश देव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)असा आहे नांदेड पॅटर्नपॅथॉलॉजिस्ट संघटनेचे नोंदणीकृत सभासद असलेले पॅथॉलॉजिस्ट हे फक्त दोनच अधिकृत पॅथॉलॉजी लॅबोरेटरीसोबत संलग्न असतील. त्यांच्या स्वाक्षरी शिवाय कोणत्याही रुग्णाचा तपासणी अहवाल वितरीत होणार नाही़ नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती किंवा पॅथॉलॉजीसोबत व्यावसायिक भागिदारी करणार नाहीत़
‘बोगस पॅथॉलॉजी लॅबला नांदेड पॅर्टनने रोखा’
By admin | Published: April 16, 2017 2:38 AM