पुणे : मध्य महाराष्ट्रात उष्मा आणि गारवा यांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच असला तरी उर्वरित महाराष्ट्रातील पारा वाढू लागला आहे. राज्यात बुधवारी कोकणातील भिरा, नांदेड आणि सोलापूरमध्ये तापमानाचा पारा सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअसच्या घरात गेला होता.मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत किमान तापमानात घट नोंदविण्यात आली असून, मराठवाडा व विदर्भात मात्र किंचित वाढ झाली आहे. परभणी, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्णांचा पाराही पस्तीशीच्या घरात आहेत. पुण्यात गारवा आणि उष्णतेचा खेळ सुरूच असल्याचे वेध शाळेने केलेल्या नोंदीवरून दिसून येत आहे. किमान तापमानाच्या बाबतीत पुणे राज्यातील सर्वात थंड ठिकाण ठरले आहे. भिरा येथील कमाल पारा ३८ वर असून, किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवर आहे. परभणीचे कमाल तापमान ३६.७, तर किमान तापमानाचा पारा २०.२ अंश सेल्सिअसवर असल्याने येथील उष्म्यातही वाढ झाली आहे. नांदेड ३८, बीड ३७.२ आणि अकोला येथील तापमान ३६.४ अंश सेल्सिअस इतके आहे. (प्रतिनिधी)
भिरापाठोपाठ नांदेड, सोलापूर सर्वांत उष्ण
By admin | Published: March 09, 2017 1:11 AM