ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. १६ - नांदेडमध्ये वर्दळ नसलेल्या भागात बसलेल्या युवक युवतीला कथीत संस्कृती रक्षकांनी बेदम मारहाण करत या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिडीत तरुण - तरुणीने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
पाच दिवसांपूर्वी नांदेडमधील अर्धापूर येथे तरुण व तरुणी गावात फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी गप्पा मारत बसले होते. या दरम्यान तिथे १२ जणांचे टोळके आले व त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्या तरुणाचा मोबाईल फोनही हिसकावून घेण्यात आला. त्या गुंडांनी तरुणीला मारहाण करत तिच्याशीही असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुण व तरुणीने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही. मात्र या कथीत संस्कृती रक्षकांनी सोमवारी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्याने पिडीत तरुणाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही महिन्यांपूर्वी लातूर येथेही संस्कृती रक्षकांनी तरुण -तरुणीला बेदम मारहाण करत मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला होता.