वाकड : महाकाय, पिळदार शरीरयष्टी, अक्राळविक्राळ शिंगे असलेला रुबाबदार असा नंदीबैल वाकड परिसरातील नागरिकांचे भविष्य सांगत दारोदार फिरत होता. फिरता-फिरता तो सुदर्शन कॉलनी क्रमांक ३मध्ये आला अन् दुर्दैवाने येथे स्ट्रॉम वाटर लाइनच्या नुकत्याच झालेल्या एका चेंबरवरती तो थांबला. त्या चेंबरला त्याचा भार सहन न झाल्याने हळूहळू नंदी त्या चेंबरमध्ये रुतत चालल्याचे याच्या धान्याच्या अचानक लक्षात आले की, मात्र काही कळण्याच्या आत हा नंदीबैल एकदम चेंबरच्या नऊ फूट खोल खड्ड्यात पडला. नंदीला काही होईल, याच्या भीतीने तो धास्तावला. काही क्षणार्धात नंदी जमिनीखाली खोल खड्ड्यात रुतल्याने त्याच्या डोळ्यांपुढील अंधकाराने तो ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याने परिसरातील लोकांची एकच भाऊगर्दी जमली. या लोकांकडे त्याचा मालक गयावया करत होता, मदतीची याचना करत होता. मात्र, कोणाला काहीही सुचत नव्हते की, एवढ्या मोठया नंदीला वरती काढायचे कसे? त्यामुळे उपस्थित लोकांनी राष्ट्रवादी युवकचे मयूर कलाटे यांना घटनेची माहिती दिली. ते घटनास्थळी पोहचताच त्यांनी तत्काळ अग्निशामक दल आणि उद्योजक विनायक बाळासाहेब कलाटे यांच्या जेसीबी मशिनला पाचारण केले. अखेर धीर सोडत संकटासमोर गुडघे टेकत घायाळ होऊन तो खाली बसला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक व मयूर कलाटे यांनी योजना आखत चेंबरभोवतालचा भाग चारही बाजूनी फोडून काढला. त्याला दोरीच्या साहाय्याने चारही बाजूंनी बांधत जेसीबीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र नंदीबैल बसून असल्याने त्याचा पाय मोडला असावा, अशी शंका सर्वांनी उपस्थित केली. मात्र, वरती येताच काही सेकंदानी तो ताटकन उठताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. (वार्ताहर)>मुका-प्राणी मानवाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे बैल तर शेतकऱ्याचे संपूर्ण कष्ट उभ्या अंगावर वाहून राबतो त्या मुक्या प्राण्याला इमानी बैलाला काही होऊ नये म्हणून आम्ही तत्परता दाखवीत मदत केली. मात्र त्याचा मालक आणि नंदी यांच्यातील नाते पाहून आम्हीही भारावलो. - मयूर कलाटे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
नंदीबैल पडला चेंबरमध्ये
By admin | Published: September 18, 2016 1:01 AM