औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे २२ वे महापौर होण्याचा मान शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नंदकुमार घोडेले यांना प्राप्त झाला. आतापर्यंतच्या महापौर निवडणुकांमध्ये महापौर, उपमहापौरांना जेवढे मतदान झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान घोडेले यांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यानुसार आज त्यांना सर्वाधिक 77 मते मिळाली यासोबतच त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत नवा विक्रम प्रस्थापित केला.तर उपमहापौर विजय औताडे यांना ही 77 मते पडली.शिवसेना-भाजप युती दुभंगण्याच्या मार्गावर असताना महापौर निवडणुकीच्या तब्बल २५ दिवस अगोदर शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे युतीचा संसार तुटता तुटता वाचला. भाजप नेत्यांची मनधरणी करून अखेर घोडेले यांनी पाठिंबा मिळविला. मागील आठवड्यात भाजपने जड अंत:करणाने घोडेले यांना पाठिंबा दिला. २५ ऑक्टोबर रोजी भाजपने निष्ठावंतांना डावलून अत्यंत नवख्या उमेदवाराला उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर केली. विजय औताडे यांची या पदावर वर्णी लावण्यात आली आहे. यातून घोडेले यांना खूप काही फायदा झाला नाही. उलट अडीच वर्षे भाजपला तोटाच सहन करावा लागणार आहे.आज सकाळी ११ वाजता महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांना ७७ मते घेऊन विजयी झाले. तर एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी यांना २५ व कॉंग्रेसचे अयुब खान यांना ११ मते मिळाली. विजय औताडे यांना 77 मते पडली. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी काम पाहिले. मागील निवडणुकांप्रमाणेच यंदाही सर्व नगरसेवकांनी हात उंचावून सभागृहात मतदान केले.शिवसेना-भाजप युतीचे सहलीवर गेलेले सदस्य सकाळीच शहरात दाखल झाली. सकाळी १०.३० वाजता सर्व युतीचे नगरसेवक एकत्र मनपात आले. सर्वच पक्षांनी खबरदारीचा उपाय म्हणून व्हीप जारी केला होता.
सेना-भाजपा युतीचे नंदकुमार घोडेले औरंगाबादच्या महापौरपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 3:51 PM