डहाणू / नंडोरे : प्रशासनाने या ग्रामपंचायतीची पाण्याची समस्या लक्षात घेऊन जीवन प्राधिकरणामार्फत २००९ साली लाखो रू. खर्च करून पाण्याच्या टाक्या व जलवाहिन्या नंडोरे-देवखोप ग्रामपंचायतीच्या हद्दीत टाकल्यात पण आजतागायत उभ्या असलेल्या या टाक्या शोभेच्याच ठरल्या आहेत. पालघरच्या २६ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नंडोरे-देवखोप ग्रामपंचायतीचा ही समावेश असून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध होऊन २००९ मध्ये नंडोरे साठी ६० हजार लिटर व देवखोपसाठी ५० हजार लिटर क्षमतेच्या दोन स्वतंत्र पाण्याचा टाक्या बांधून जलवाहिन्याही टाकण्यात आल्या पण गेल्या सात वर्षापासून ही जलवाहिनी व या पाण्याच्या टाक्या कोरड्याच राहीलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या या टाक्या २०३५ च्या लोकसंख्येला गृहीत धरून बांधण्यात आल्या होत्या. पण एवढा लक्षावधी खर्च होऊनही या गावांना पाणी का मिळू शकले नाही याचे उत्तर ना प्रशासनाकडे आहे ना लोकप्रतिनिधीकडे. नंडोरे गावात आठ पाडे तर देवखोप गावासह सात पाडे आहेत. या भागात हक्काचे पाणी पोहचत नसल्याने गेल्या सात वर्षाच्या काळात ग्रा. प. ने गावाना व पाड्यांना बोअरवेल (हातपंप) दिलेले आहेत व विहिरीही आहेत. त्याद्वारे हे पाडे व गाव आपली तहान भागवत आहे पण उन्हाळ्यात या बोअरवेलच्या किंवा विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे या गावपाड्यांना पाणी मिळणे मुश्कील होते व त्यांची पाण्यासाठी दरवर्षी नेहमीच प्रचंड परवड सुरू होत असते.(वार्ताहर)
नंडोर,देवखोपला पाणी कधी!
By admin | Published: April 27, 2016 4:25 AM