लोणावळा : नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर व बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला लवकरच ‘रामसर’चा दर्जा मिळणार असल्याचे संकेत मंगळवारी येथे सुरू असलेल्या पाणथळ आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मिळाले. बॉम्बे नॅचरल सोसायटी (बीएनएचएस)ने ही परिषद आयोजित केली आहे.नवेगाव बांध, माहुल (शिवडी खाडी), हतनूर धरण, ठाणे खाडी, नांदूर मधमेश्वर, लोणारसह जायकवाडी धरण परिसराला ‘रामसर’चा दर्जा मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यातील नांदूर मधमेश्वर आणि लोणारला लवकरच संमती मिळेल, असे सूतोवाच मँग्रोव्ह फाऊंडेशनचे अप्पर प्रधान वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी केले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त दिले होते. ‘रामसर’च्या यादीत भारतातील २६ पाणथळ जागांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. या दोन जागांच्या समावेशामुळे महाराष्ट्रही या यादीत झळकेल.केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला वासुदेवन, केंद्रीय पर्यावरण, वने हवामान बदल विभागाचे महासंचालक सिधान्त दास, बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे उपस्थित होते. वासुदेवन यांनी स्थलांतरित पक्ष्यांसंदर्भात महाराष्ट्रात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. राज्यातील खारफुटीच्या वनात वाढ झाल्याचे सांगून लवकरच नांदूर मधमेश्वर अभयारण्य व सुप्रसिद्ध लोणार सरोवराला ‘रामसर’चा दर्जा मिळणार असल्याचे सांगितले. सुप्रियो म्हणाले की, स्थलांतरित पक्षी हे जागतिक प्रवासी आहेत. त्यांना कोणतीही राजकीय सीमा नाही. हे पक्षी जातात, त्या देशांनी त्यांच्या निवासाची योग्य सोय केली पाहिजे.नांदूर मधमेश्वर : नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या २६५ प्रजातींची नोंद झाली आहे. रामसरमध्ये आढळणाऱ्या १४८ स्थलांतरित पक्ष्यांपैकी ८८ प्रजाती नांदूर मधमेश्वरमध्ये आढळतात. या अभयारण्यात एकूण ५ हजार ६८७ पक्षी आढळले आहेत.लोणार सरोवर :हे सर्वात छोटे पक्षी अभयारण्य आहे. विविध प्रजातींच्या पक्षांचे अस्तित्व इथे आहे. सरोवरातील पाण्याचा सामू (पीएच) १०.५ असून यातील स्पुरूलिना शैवालामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहेत.‘रामसर’चा दर्जा म्हणजे काय? : इराणमधील रामसर शहरात १९७१ मध्ये जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात एक परिषद झाली. तिथे झालेला ठराव भारतासह ९० टक्के देशांनी स्वीकारला. तो १९७५ पासून अमलात आला आहे. यानुसार ज्या पाणथळ जागेवर एकाच वेळी २० हजारांपेक्षा जास्त संख्येने पक्षी आढळतात किंवा त्या ठिकाणाला भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे त्याला ‘रामसर’चा दर्जा दिला जातो.
नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवराला ‘रामसर’चा दर्जा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 3:20 AM