लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नांदूर-मानूर येथील पुलावरून एका तीस वर्षीय महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह गोदावरीत उडी घेतल्याची घटना शनिवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास घडली़ या घटनेत महिला व तिच्या चार वर्षीय मुलीला वाचविण्यात यश आले असून दोन वर्षीय मुलगा मात्र वाहून गेला आहे़ दरम्यान संबंधित महिला ही बेशुद्ध असल्याने तिची ओळख पटविण्याचे काम सुरू असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मानूर गावाजवळील गोदावरील नदीपात्रात एका महिला व चार वर्षीय मुलगी वाहत असल्याची माहिती नागरिकांनी दिली़ त्यानुसार घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिक व पोलिसांनी या मुलीस वाचवून व १०८ नंबरच्या अॅम्ब्युलन्सला कॉल केला़ अॅम्ब्युलन्समधील डॉ़अमित येवला हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी महिला व चारवर्षीय मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ महिला व तिच्या चार वर्षीय मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सुदैवाने मुलगी वाचली असून महिला बेशुद्ध आहे़ चार वर्षीय मुलगी घाबरली असल्याने तिला आपले नावही सांगता येत नसल्याने या कुटुंबाची ओळख पटलेली नाही़ दरम्यान या मुलीपेक्षा लहान दोन वर्षांचा मुलगा मात्र गोदावरीत वाहून गेला आहे़दरम्यान या घटनेची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून महिलेने मुलांसह गोदावरील उडी का घेतली याचे कारण तसेच महिलेच्या कुटुंबियांची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होते़--इन्फो--चिमूकलीचे दैव बलवत्तऱ़़महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह गोदावरील उडी मारली़ यामध्ये मुलगा वाहून गेला असला तरी मुलगी व महिला बचावली आहे़ यामध्ये महिला बेशुद्ध असली तरी मुलगी मात्र सुदैवाने बचावली असून ठणठणीत आहे़ या प्रकारामुळे ती घाबरली असून ती केवळ आई हा एकच शब्द बोलत होती़ केवळ, दैव बलवत्तर म्हणून ही चिमुकली बचावली आहे़