नंदुरबार :
पणन संचालनालयाकडून राज्यातील ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची २०२१-२०२२ या वर्षांची क्रमवारी जाहिर झाली आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत पणन विभागाने बाजार समित्यांचे गुणांकन केले होते. या रँकिंगमध्ये राज्यातील पहिल्या ५० स्मार्ट बाजार समित्यांमध्ये नंदुरबार १८ तर शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीला २९ वे रँकिंग मिळाले आहे.
राज्य पणन संचालनालयाला जागतिक बँकेकडून आर्थिक सहकार्य करुन राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुधारणा करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यांतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत ३५ निकषांची तपासणी करुन २०० गुण देण्यात आले होते. पणन संचालनालयाने जााहिर केलेल्या क्रमवारित नंदुरबार बाजार बाजार समितीला विविध सुविधांमुळे १३८ गुण मिळाल्याने १८ वे स्थान दिले गेले. १३२ गुणांसह शहादा बाजार समिती राज्यात २९ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील तळोदा बाजार समिती ८६ , नवापूर १२५, अक्कलकुवा १४४ तर धडगाव बाजार समितीला राज्यात १४५ वे स्थान दिले गेले आहे.