ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 02 - नराधम पित्याने पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वस्तापूर-झोडगा शिवारात मंगळवारी रात्री घडली. पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
वस्तापूर, वाघा गट ग्रामपंचायतीच्या इ-क्लास जमिनीवर झोडगा येथील आरोपी त्याच्या पत्नी व दोन मुलींसह राहतो. आरोपी नेहमी दारुच्या नशेत मारझोड करत असल्यामुळे त्याची पत्नी आपल्या दोन मुलींना सोडून चार महिन्यांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील माहेरी राहावयास गेली आहे. मंगळवारी सायंकाळी आरोपीने आपल्या ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. पीडीत मुलीने रात्रीच मोबाईलवरून आईला झालेला प्रकार सांगितला. मुलीने आपबिती सांगितल्यानंतर आई तातडीने घरी परतली व तीने मुलीसोबत कुकर्म करणा-या आपल्या पतीविरुद्ध पिंजर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन आरोपीला रात्रीच अटक केली. त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३४२, ३७६ (२), (१) व बालकांविरुद्ध लैंगिक अत्याचार कायद्याच्या (पास्को)कलम ४, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी पिंजर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.