"बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर..."; विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मुलाला नरहरी झिरवळांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 02:58 PM2024-07-29T14:58:29+5:302024-07-29T15:00:46+5:30
विधानसभा निवडणूक लढण्यावरुन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलगा गोकुळ झिरवाळ यांना खोचक सल्ला दिला.
Narahari Zirwal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटाच्या बैठकीस गैरहजर राहिल्याने ते शरद पवार गटात जाणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र आता नरहरी झिरवाळ दिंडोरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं. दुसरीकडे झिरवळ यांना उमेदवारी घोषित झाल्याने दिंडोरीत बाप विरुद्ध मुलगा अशी लढत होणार असल्याचे म्हटलं जात आहे. यावरुनच नरहरी झिरवळ यांनी मुलगा गोकुळबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत दिसले होते. त्याआधी ते शरद पवार गटाच्या एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी बोलताना मी शरद पवार यांच्यासोबत आहेत. मी महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहे, माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवार दिसतील, असे वक्तव्य गोकुळ झिरवाळ यांनी केले होते. त्यामुळे गोकुळ झिरवाळ यांनी वडिलांविरुद्ध बंड थोपटल्याचे म्हटलं जात होतं. मात्र आता नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिंडोरीमधील जनसन्मान यात्रेदरम्यान नरहरी झिरवाळ यांची दिंडोरीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. त्याआधी गोकुळ झिरवाळ यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी हवी असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात वडील विरुद्ध मुलगा अशी लढत होण्याची चिन्ह आहेत. याविषयी बोलताना नरहरी झिरवाळ यांनी मुलाला खोचक शब्दात टोला लगावला आहे.
शरद पवार गटाच्या कार्यक्रमात गोकुळ यांच्या उपस्थितीबाबत नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलं. "त्याने सत्कार करू का असे विचारले होते मी म्हटलो सत्कार कर आणि निघून ये. हा गेला तर गेला याची आमदार होण्यापर्यंत मजल गेली तर कसं व्हायचं?," असं नरहरी झिरवाळ म्हणाले. "राजकारणात प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे. त्याचे वय पाहता त्याने अजून खूप काही करणं गरजेचं आहे. मी दिलेल्या भांडवलावर लढण्यापेक्षा त्याने स्वतःच काहीतरी करावं. सगळंच बापाचं वापरून कसं चालणार?, असेही नरहरी झिरवाळ म्हणाले.
तसेच "त्याचा बाप ग्रामपंचायत सदस्यापासून वर जात गेला तेव्हा आमदारपर्यंत पोहचला. बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर तिथून सुरुवात करायला हवी. समजून घेण्यात ५ नाही तर १० वर्ष जातात त्यामुळे त्याने ते उद्योग करू नये," असाही सल्ला नरहरी झिरवाळ यांनी दिला.