मुंबई : उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची शपथविधी झाल्यापसून भाजपचे नेते नारायण राणेंचा टीकेचा बाण अधिकीच टोकदार झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरेंवर टीका करण्याची कोणतेही संधी ते सोडत नाही. मंगळवारी कुडाळ तालुक्यात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना आमदार व शिवसैनिकांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
स्वार्थापोटी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एका रात्रीत सर्व अधिकार देऊन शिवसेनेचे आमदार व शिवसैनिकांना अंधारात ठेवून स्वत: मुख्यमंत्री बनले असल्याचा गौप्यस्फोट कुडाळ येथील पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी केला. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे यांच्याऐवजी त्यांनी शिवसैनिकालाच मुख्यमंत्री बनविले असते, असेही राणे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे हे शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करणार असल्याचे बोलत होते.निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना तसेच सांगत त्यांना व्यस्त ठेवले. यावेळी मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे माजी मंत्री सुभाष देसाई,एकनाथ शिंदे व खासदार संजय राऊत यांची नावे पुढे येत होती. मात्र, अशा वेळी महाविकास आघाडीच्या शेवटच्या झालेल्या बैठकीनंतर एका रात्रीत उद्धव ठाकरे, संजय राऊत,आमदार आदित्य ठाकरे हे शरद पवार यांच्या घरी गेले व यावेळी उद्धव ठाकरे यांनी पवार यांना आपण स्वता: मुख्यमंत्री होण्यास इच्छुक असून तुम्हीच नाव जाहीर करा, अशी विनंती केली.
त्यांनतर दुसऱ्याच दिवशी पवार यांनी स्वता: उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी होणार असल्याचे घोषित केलं.असे करताना ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना अंधारात ठेवले तसेच सर्व अधिकार पवार यांना दिल्यामुळे आता त्यांना पवार यांचेच ऐकावे लागणार आहे.बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी जसे त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री न बनविता आम्हा शिवसैनिकांना मुख्यमंत्री केले, तसेच यावेळी ही त्यांनी शिवसैनिकालाच मुख्यमंत्री केले असते,असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.