Uddhav Thackeray vs Narayan Rane: राज्याच्या राजकारणात सध्या अनेक गोष्टी सुरू आहेत. महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बेजबाबदार विधान केल्याने, हक्कभंगाचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. अशातच राऊतांचे एक विधान सध्या चर्चेत आहे. '२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठीउद्धव ठाकरे हे उत्तम चेहरा आहेत', असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. राऊतांच्या या विधानावर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पण राऊत-ठाकरेंचे कट्टर विरोधक मानले जाणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या विधानाच चांगलाच समाचार घेतला आहे.
राणेंची सूचक अन् जहरी प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेपंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील का हे विचारल्यावर राणेंनी सुरूवातील माध्यम प्रतिनिधींसमोर थेट हातच जोडले. त्यानंतर ते म्हणाले- "असली विधानं करणं हे म्हणजे कहर आहे. विधिमंडळात ते येत नाहीत. मातोश्रीतून बाहेर न पडता ते पंतप्रधान कसं बनणार. (पंतप्रधान बनणं म्हणजे) काय जेवण आहे का? अशा प्रकारची विधानं करणं म्हणजे त्या पदाची चेष्टा आहे. त्यामुळे उगाच काही पण नावं घेऊ नका," अशा शब्दांत नारायण राणेंनी एका प्रतिक्रियेत राऊत-ठाकरे दोघांना टोला लगावला.
काय म्हणाले होते राऊत?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का याबाबत आता भाकीत करणं तेवढं सोपं नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. पण, उद्धव ठाकरे हे एक उत्तर चेहरा आहेत. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू… आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा आहे," असे राऊत म्हणाले होते.
दरम्यान या मुद्द्यावर उद्धव ठाकरे स्वत: वेगळंच म्हणाले. "असं कोणतंही स्वप्न माझ्या मनात नाही. स्वप्नात रंगणारा किंवा दंग होऊन जाणारा मी अजिबातच नाही. जी जबाबदारी येते ती मी कायम पार पाडतो. तशीच माझ्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली होती. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम सर्वसामान्य नागरिकांनी खांद्यावर घेणं गरजेचं आहे," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.