मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत मंत्रिपदाचा राजीनामा देणारे नारायण राणो यांच्याशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन तास चर्चा केली खरी, परंतु राजीनाम्यावर कोणताच निर्णय न घेता चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात ढकलला.
राणो यांनी आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणो म्हणाले, दोघांनीही आपल्याला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांना आजच्या चर्चेत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने राजीनाम्याच्या निर्णयावर आपण ठाम आहोत. आगामी विधानसभा निवडणूक मी लढविणार नाही. त्यामुळे कुडाळमधून माङयाऐवजी नितेश निवडणूक लढेल, असेही राणोंनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्यासह आपण तिघे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटून चर्चा करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले आहे, असे राणो यांचे म्हणणो असले तरी मुख्यमंत्र्यांनी त्यास दुजोरा दिला नाही. काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी आपण चर्चा करू, एवढेच आश्वासन आपण राणो यांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. आज राणोंसमवेत झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती, राष्ट्रवादीसोबतचे जागावाटप याबाबतच आम्ही चर्चा केली, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
राणोंनी एक संधी ठेवली
राणो यांच्या राजीनाम्यावरून उठलेला
धुरळा येत्या दोन-तीन दिवसांत खाली बसेल आणि सगळे सुरळीत होईल, असे काँग्रेसच्या सूत्रंनी सांगितले. आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्याविरुद्ध बंड करताना आपला राजीनामा तेथील राज्यपालांकडे दिला. मात्र राणो यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देऊन एक संधी ठेवली असल्याचे बोलले जात आहे.
प्रचार समितीचे प्रमुखपद
राणो यांचा मुख्यमंत्रिपदावर दावा असला, तरी त्यांना मुख्यमंत्रिपद किंवा प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता कमीच आहे. सूत्रंनी सांगितले की, विधानसभा निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढविली जावी अशी राणो यांचीच इच्छा असल्यामुळे निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद देऊन तडजोड केली जाईल.