BJP Narayan Rane News: लोकसभा निवडणुकीत अद्यापही काही जागांवरून महायुतीत तिढा असल्याचे दिसत आहे. साताऱ्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागाही भाजपाकडे गेल्याचे दिसत आहे. भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर नारायण राणे यांनी यावर स्पष्ट शब्दांत पहिली प्रतिक्रिया दिली.
कुठलेही काम सूरु करायचे असेल किंवा निवडणूक लढवायची असेल तर ग्रामदेवतच दर्शन घेतो, असे सांगत नारायण राणे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात जागा वाटपाबाबत महायुतीत कोणताही तिढा नव्हता. उमेदवारी मिळणार हे अगोदरच माहिती होते. प्रचारालाही सुरुवात केली होती. विकासाचा व मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. ४०० पार करायचे आहे. विकसित देश बनावा, आत्मनिर्भर बनावा, हे आपले प्रचाराचे मुद्दे असतील, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.
उमेदवारी दिली त्याबद्धल आभारी आहे
सामंत बंधुंचा आभारी आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दिली त्याबाबत आभारी आहे, असे नारायण राणे म्हणाले. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली. उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झालेला नाही. आम्ही आधीपासूनच काम करत होतो. किरण सामंत हे नाराज नाहीत, या निवडणुकीत आम्ही एकत्र काम करू. आमचा फेविकॉलचा जोड या निवडणुकीत दिसेल. राणे आणि सामंत मिळून निवडणुकीला सामोरे जाऊ, असे नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, आपण नेतृत्व मानतो. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखी व्यक्ती स्वत: हस्तक्षेप करते. मुख्यमंत्री काही सूचना करतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे पूर्वीपासूनचे सहकारी असलेली व्यक्ती काही गोष्टी सांगते, तेव्हा काही गोष्टींमध्ये चार पावले मागे यावे, असे आम्ही चर्चा करून ठरवले. पण चार पावले मागे आलो, म्हणजे भविष्यात आपण काहीच करायचे असे होत नाही. आम्ही ज्या मुद्द्यांवर ठाम होतो, त्यावर आजही ठाम आहोत. किरण सामंत यांना आज ना उद्या खासदार करायचे हे निश्चित आहे. त्यामुळे आज जो काही तिढा निर्माण झाला होता, तो सोडवण्यासाठी किरण सामंत यांनी स्वत: पुढाकार घेतला, तसेच राजकारणात किती मोठे मन असावे लागते, हे त्यांनी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दाखवून दिले, असे शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.