चिपळूण (रत्नागिरी) : पावसाळी अधिवेशनामध्ये नारायण राणे यांनी राज्य सरकारची लक्तरे वेशीवर टांगली होती. आता हिवाळी अधिवेशनात त्यांनी आपले वाभाडे काढू नयेत, यासाठी त्यांना चौकशीत अडकविण्याचा डाव आहे असा आरोप रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. अजूनही आपल्याकडे कसल्याही चौकशीसाठी ईडीचे(अंमलबजावणी संचालनालय) कोणीही अधिकारी आलेले नाहीत, असा खुलासाही त्यांनी केला.राणे आणि त्यांच्या परिवाराची ईडीकडून चौकशी सुरू असल्याचा संदेश गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना नीलेश राणे यांनी आपल्या नावावर २०० कंपन्या असल्याचे आपल्याला प्रथमच समजले. मुंबईतील ज्या करी रोड पोलीस स्थानकात आमच्यावर गुन्हा दाखल होणार असे म्हटले जात आहे, त्याचे काय झाले? गुन्हा दाखल झाला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. केतन तिरोडकर यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेऊन केतन तिरोडकर कोण आहे, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
‘नारायण राणेंना चौकशीत अडकविण्याचा डाव’
By admin | Published: November 09, 2016 5:12 AM