लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कायदा हातात घेऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी घटक प्रमुखांना दिले आहेत.
सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शांतता कायम राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. राणे यांनी सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावर शिवसैनिकांकडून रात्रीपासून प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली होती. राणेंच्या वक्तव्याबद्दल नाशिकमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पथक नेमण्यात आले. त्याबाबतचे पत्र व्हायरल झाले होते. त्यानंतर शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या. शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन निषेध करू लागले. भाजपच्या कार्यालयावर हल्ला होऊ लागल्यानंतर त्यांच्याकडून निषेध व्यक्त होऊ लागल्याने पोलिसांना दोन्हींकडील कार्यकर्त्यांना आवर घालताना सौम्य लाठीमार केला होता.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे आदेशnराणेंना अटक करण्यात आल्याने भाजपच्या नेते निषेध करू लागल्याने वातावरण आणखी चिघळू लागले, राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊ लागले.nत्यामुळे संजय पांडे व अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेश दिले.