उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. लबाड लांडगा, यांच्यासारखा खोटारडा माणूस मी पाहिला नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी किती मराठी लोकांना रोजगार दिला. काल जे काही बोलले आहेत, खोका, गिधाडं आत जाल. संजय राऊतांची सोबत करायला. खोक्याची चौकशी होणार आहे, यांच्या मागे ईडी लागणार आहे, असा इशारा राणे यांनी दिला.
मला भाजपात घेऊ नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शहांना कालपर्यंत फोन करत होते. त्याच अमित शहांवर तुम्ही गिधाडं वगैरे टीका करता. चांगले बोलता येत नाही काय? बाप पळविणाऱ्या औलादीचे भाष्य करताय, बापाची ध्येय धोरणं न ठेवणारा हा माणूस. बाळासाहेबांची एकनाथ शिंदे, आमदार आठवण काढतात, त्याला चोरी कसे काय म्हणू शकता. साहेब असे नव्हते, ते मोठ्यांचा आदर करायचे. उद्धव ठाकरे चार खासदार, दहा आमदार निवडून आणू शकत नाही, असे राणे म्हणाले. राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला.
पदासाठी आणि पैशांसाठी आणि खोक्यासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली. अमित शहा मुंबईवर चालून आले असे म्हणता, देशाचा गृहमंत्री मुंबईत आला तर मुंबई तुमची आहे का? कलानगरला टक्केवारीसाठी ऑफिस उघडले. पालिकेच्या टेंडरमागे १५ टक्के घेत होते. आता आम्हाला ठेकेदारांनाच समोर आणावे लागेल, असा आरोप राणे यांनी केला.
मुंबईवर संकट येते तेव्हा केंद्र सरकार नेहमी महाराष्ट्राला मदत करते. अशी एकही नैसर्गिक आपत्ती नाही, तिकडून मदत येत नाही. हे कधी वाचतच नाहीत. मातृभूमीसाठी काय केलेत तुम्ही, मुंबईच्या भूमीवर राहणाऱ्या लोकांसाठी काय केले. मुंबईत दोन लाख भिकारी आहेत. काय केलेत यांच्यासाठी, मातोश्रीच्या आजुबाजुलाच पाच-सहा हजार भिकारी आहेत, असेही राणे म्हणाले.
भावना गवळींच्या वडिलांनी आयुष्य शिवसेनेसाठी घालवले. भावना गवळी तर लहान असल्यापासून खासदार आहेत. त्यांच्यावर मोदींना राखी बांधण्यावरून टीका केली. तुम्हाला राखी बांधण्याचे काय महत्व असणार. ज्या महिलेने शिवसैनिकांचे नेतृत्व केले, एवढी वर्षे तिने पक्षाची सेवा केली, तिच्याविरोधात असे बोलतात. मी मर्द आहे, हे काल बोलले नाहीत. मोदींच्या कामासमोर तुम्ही नखाएवढे पण नाहीत. बावनकुळे की एकशेबावनकुळे कळेल कसे, कधी शाळेत गेलातच नाही, अशी टीका राणे यांनी केली. यापुढे वाकड्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्रात फिरू शकणार नाहीत, असा इशारा राणे यांनी दिला.