मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाला आपला विरोध अधिक तीव्र केला आहे. नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, प्रसंगी भाजपाने दिलेल्या खासदारकीचा राजीनामा फेकेन, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सौदी अरबस्तानच्या अरामको आणि एडनॉक या कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या. त्यामुळे सरकार हा प्रकल्प रेटून नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध करणारे नारायण राणे अधिकच आक्रमक झाले आहेत. नाणार प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, "नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही. वेळ पडल्यास शिवसेनेसारख्या धमक्या न देता प्रकल्पाविरोधात राजीनामा फेकेन." यावेळी प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचाही राणेंनी समाचार घेतला. प्लॅस्टिक बंदीचा निर्णय केवळ व्यापा-यांकडून पैसै काढण्यासाठी असल्याचे ते म्हणले.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सौदी अरबस्तानच्या अरामको आणि एडनॉक या कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या होत्या.रत्नागिरी जिल्हयात ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’च्या (आरआरपीसीएल) वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी अरामको कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन एच.नसीर आणि संयुक्त अरब अमिरात(यूएई) चे राज्यमंत्री तथा एडनॉक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान आणि यूएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या.