मुंबई - भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज आठव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले. यानिमित्त ट्विट करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. राणे ट्विट करत म्हणाले, “साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती. पद आणि पैशासाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती."
नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "माननीय शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. माननीय साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती. पद आणि पैशासाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती. महाराष्ट्रातील आताचे सरकार नीतिमत्ता सोडून केवळ तडजोडीवर तयार झाले आहे. आपण असता तर हे घडू दिले नसते."
नारायण राणे यांच्या शिवाय त्यांचा मुलगा नितेश राणे यांनीही आज एक ट्विट करत उद्धव ठाकरेंव निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी आज उद्धव ठाकरे इंदिरा गांधींना अभिवादन करतानाचा फोटो ट्विट करत, "दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुन्यतिथी दिनी त्यांच्या फोटोसमोरील राहुल गांधीजींच्या अशाच फोटोची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही?? असा खोचक प्रश्न केला आहे.
'महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र यावं हीच बाळासाहेबांना आदरांजली ठरेल' -रामदास आठवले यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर, ट्विट करुन महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याची इच्छाही व्यक्त केली. ''शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! त्यांच्या स्वप्नातील शिवशक्तीभीमशक्ती भाजप एकजूट आम्ही साकारली पण नंतरच्या काळात ती एकजूट तुटली याची खंत वाटते. भविष्यात पुन्हा ती एकजूट व्हावी हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल!'', असे ट्विट रामदास आठवले यांनी केले आहे.