मुंबई: शिवसेना स्वत:हून सत्तेतून बाहेर पडणार नाही. त्यांना किक मारुनच बाहेर काढावं लागेल. अन्यथा ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. शिवसेनेला डिवचण्यासाठी निवडलं असेल तर जोरात डिवचायला हवं. शिवसेनेसारख्या पक्षाला याचा काहीही फरक पडत नाही, असा टोलादेखील त्यांनी लगावला. न्यूज18 लोकमत वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राणे बोलत होते. नारायण राणेंनी शिवसेनेवर तोफ डागताना भाजपाही इशारा दिला. 'भाजप आणि शिवसेनेनं युती केली तर महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र्य लढेल', असं सूचक विधान त्यांनी केलं. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला 200 च्या आसपास जागा मिळतील, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं. 'केंद्रात भाजपचं सरकार येईल. पण, ते बहुमतात असेल की नाही, हे सांगू शकत नाही. भाजपाला 200 पर्यंत जागा मिळतील', असा अंदाज राणेंनी व्यक्त केला.आनंद दिघेंच्या मृत्यूला बाळासाहेब ठाकरे जबाबदार असल्याचं विधान आठवड्याभरापूर्वी निलेश राणेंनी केलं होतं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. या विधानाबद्दल नारायण राणेंनी मुलाची पाठराखण केली. 'माझ्या मुलगा जे बोलला, त्यात काहीच चुकीचं नाही. माझ्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक आरोप केले. त्यामुळे माझ्या मुलाला राग येणं स्वाभाविक आहे. त्यानं ज्या भाषेत उत्तर दिलं ते कुणीही देऊ शकतं. शेवटी तो राणेंचा मुलगा आहे,' असं म्हणत नारायण राणेंनी मुलाची बाजू घेतली. मात्र, आनंद दिघे प्रकरणावर तुमचं मतं काय? या प्रश्नावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.
शिवसेनेला किक मारुन सत्तेबाहेर काढावं लागेल- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 11:21 AM