मुंबई - भाजपा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर (Shivsena) जोरदार हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी होती. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यानिमित्त सावरकरांना अभिवादन करण्यात आलेले नाही. यावरूनच नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी" असं राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.
नारायण राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त @CMOMaharashtra आणि मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरुन अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी" अशा शब्दांत राणेंनी जोरदार टीका केली आहे. याआधीही त्यांनी विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी संजय राठोड यांच्यावर टीका करताना, मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं होतं. राणे यांनी संजय राठोड हे काही संत आहेत का, अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली. तसेच, याप्रकरणी 11 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या असून अद्यापही सरकारने कारवाई का केली नाही, असा सवाल राणेंनी विचारला होता. "संजय राठोड हे मंदिरात गेले, मंदिरात जायला ते काही संत आहेत का?. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र, कोणावरही कारवाई केली जात नाही. सुशांतप्रकरणातही काय झालं, आता पूजा चव्हाण प्रकरणातही तेच होतंय."
'राज्यातील कुठलाही सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार अन् कायद्याचं ज्ञान असलेला'
"कुठल्याही समाजाने अशाप्रकारे बलात्काराच्या आरोपातील व्यक्तीच्या पाठिशी उभे राहू नये, असे आवाहनही राणेंनी केले. तसेच, हे सरकार शरद पवारांमुळेच बनलंय, त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. उद्धव ठाकरेंपेक्षा राज्यातील कुठलाही सरपंच हुशार आणि कायद्याचं अधिक ज्ञान असणारा आहे", असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. तसेच, असले कसे वाघ, हे वाघ मातोश्रीवर किंवा पिंजऱ्यात घाला, असे म्हणत संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणीही राणेंनी पत्रकार परिषदेत केली होती.