मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झाले आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आहे. शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचं सांगण्यात येत आहे. याच दरम्यान गुवाहाटीत जे ४० लोक आहेत ती जिवंत प्रेते आहेत, मुडदे आहेत. त्यांच्या बॉड्या इकडे येणार आहेत. त्यांचे आत्मे मेलेले असतील. इथे जी आग पेटली आहे, त्यात काय होऊ शकते हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे ते लटपटत आहेत. ते ४० लोक जेव्हा उतरतील तेव्हा ते मनाने जिवंत नसतील, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर जहरी टीका केली. यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
"शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?" असा सवाल राणेंनी विचारला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, 'गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील', अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?" असं राणे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुंबईत ठिकठिकाणी मेळावे आयोजित केले जात आहेत. दहिसर येथील मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जहरी टीका केली. या ४० आमदारांच्या बॉड्या इथे येतील. त्यांना डायरेक्ट शवागृहात पाठवू पोस्ट-मार्टेमसाठी. हे जिथे थांबले त्या गुवाहाटीत कामाख्या देवीचे जागरूक मंदिर आहे. तिथे रेड्याचे बळी देतात. आम्ही ४० रेडे पाठविले आहेत, द्या बळी. शिवसेनेच्या विरोधात कट-कारस्थान सुरू आहे. त्यावर लढा देत मात करू. अरे तुम्ही काय शिवसेनेशी लढणार? मेले तुम्ही अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.
नारायण राणे यांनी याआधी देखील टीकास्त्र सोडलं आहे. "एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अडीच वर्षापूर्वी फसवणूक झाल्याचं ते कबूल करतात. वारंवार अपमानस्पद वागणूक एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. यातून शिंदे यांचा स्वाभिमान जागा झाला. त्यातून त्यांनी बंड केले. बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष वाढवला, शिवसैनिकांवर प्रेम केले. पण पक्षप्रमुख, मुख्यमंत्री असूनही सहकाऱ्यांना विश्वास देता आला नाही. शिवसैनिकांना भेटीगाठी दिल्या नाहीत. मातोश्रीच्या बाहेर पडायचं नाही. त्यामुळे गुदमरलेल्या मंत्री, आमदारांनी त्यागाच्या भूमिकेवरून केलेला हा बंड आहे" असं सांगितलं होतं.