Narayan Rane vs Uddhav Thackeray | "तेव्हाच त्यांची अर्थसंकल्प समजून घेण्याची कुवत कळली होती"; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 07:57 PM2024-07-26T19:57:38+5:302024-07-26T19:58:32+5:30
Narayan Rane vs Uddhav Thackeray, Union Budget: "अर्थसंकल्प समजून घ्यायचा असेल असेल तर मी अर्थसंकल्पाचे टिपण देईन"
Narayan Rane slams Opposition, Union Budget: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच त्यांना नसल्याने राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहे. त्यांनी अर्थसंकल्पाबाबतचे तुटपुंजे ज्ञान पाजळू नये. ते करत असलेली टीका अज्ञानातून आहे, अशा घणाघात भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केला. शुक्रवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तेव्हाच त्यांची अर्थसंकल्प समजून घेण्याची कुवत कळली होती!
"कोणत्याही प्रकारचा सापत्न भाव न बाळगता महाराष्ट्रासह सर्व राज्यांसाठी भरभक्कम अशी तरतूद करून देशाला प्रगतीपथावर नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही, अशी प्रतिक्रिया अर्थसंकल्पाबाबत तोकडे ज्ञान असलेल्या ठाकरेंकडून येणे अपेक्षितच होते. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च ज्यावेळी अर्थसंकल्पाबाबतच्या आपल्या तुटपुंज्या ज्ञानाची कबुली दिली होती, तेव्हाच त्यांची अर्थसंकल्प समजून घेण्याची कुवत कळली होती," अशा शब्दांत राणे यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली.
अर्थसंकल्प समजून घ्यायचा असेल असेल तर...
"यंदाचा अर्थसंकल्प हा ४८ लाख २१ हजार कोटींचा असून मागील अर्थसंकल्पापेक्षा ३ लाख कोटींनी अधिक आहे. या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही असा सूर उद्धव ठाकरे आळवत आहेत. ठाकरे सरकारच्या काळातील अर्थसंकल्पातील आकड्यांचा त्यांना सोयीस्कररित्या विसर पडला आहे. ठाकरे सरकारच्या काळातील दोन अर्थसंकल्पात राजकोषीय तूट होती. पण तूट काय असते हे देखील ठाकरे यांना बहुतेक माहित नसावी. उद्धव ठाकरे यांना चांगल्या भाषेत बोलताच येत नाही. विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प समजून घ्यायचा असेल असेल तर मी अर्थसंकल्पाचे टिपण देईन," अशी खोचक टिप्पणी राणे यांनी केली.
समाजघटकांना सक्षम करणारा अर्थसंकल्प!
"हा अर्थसंकल्प युवक, शेतकरी, महिला व गरीब अशा समाजाच्या प्रत्येक वर्गाला ताकद देणारा, गरीब शेतकऱ्यांना लाभ देणारा, युवकांना रोजगाराच्या अगणित संधी देणारा, दलित-मागास वर्गाला सशक्त करणारा, छोटे व्यापारी, लघु उद्योग यांना बळ देणारा, मध्यमवर्ग, उद्योजक यांना सक्षम करणारा आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
राहुल गांधी यांच्यावरही डागली तोफ
"मोदी सरकारने मागच्या १० वर्षांत अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत समाजातील शेवटच्या घटकाला लाभार्थी बनवून दाखवले. जागतिक बलाढ्य अशा अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून ५ व्या क्रमांकावर आणली. आपले अर्थसंकल्पाबाबतचे अज्ञान पाजळत राहुल गांधींनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे," अशी टीका राणे यांनी केली.