सावंतवाडी - केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र असताना राणेंचे सिंधुदुर्गातील कट्टर प्रतिस्पर्धी दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना थेट इशाराच दिला आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेले वक्तव्य हा व्यापक कटाचा भाग आहे. आता नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी अन्यथा त्यांच्याविरोधात राजकीय संघर्ष अटक आहे, असे विधान दीपक केसरकर यांनी केले आहे. ( "That statement of Narayan Rane is part of a conspiracy" MLA Deepak Kesarkar Criticize Narayan Rane)
आज सावंतवाडीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली. तसेच नारायण राणें यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल वक्तव्य एका कटाचा भाग असून, महाराष्ट्रात दंगे घडवण्याचा प्रयत्न असू शकतो. नारायण राणे यांनी जी प्रतिकिया दिली त्याला शिवसैनिकांकडून उलट प्रतिकिया येणार हे त्यांना माहिती होते. मग त्यांना कोणी बोलायला लावले का? असा सवाल केसरकर यांनी केला आहे. दरम्यान, दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना इशाराही दिला. ते म्हणाले की, नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी, अन्यथा जिल्ह्यातील शांतता अबाधित राखण्यासाठी त्यांच्याविरोधात माझा राजकीय संघर्ष अटळ आहे. मी माझी भूमिका १७ तारखेनंतर स्पष्ट करणार आहे. मात्र कोरोना संकटात राणेंकडून जन आशीर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणे हे येथील जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, असेही केसरकर म्हणाले.तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देण्यावरूनही दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला. जिवंतपणी बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांनी आता त्यांच्या स्मारकाला भेट देणे म्हणजे ढोंगीपणा आहे, असा टोला त्यांनी लगावला.