सिंधुदुर्ग - कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा जाहीर केल्याने या मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली आहेत.ओसरगाव येथे बुधवारी स्वाभिमान पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्याला खासदार व स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आमदार नीतेश राणे,आदी उपस्थित होते.विधानपरिषदेच्या कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी येत्या २१ रोजी मतदान होत आहे. यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार मतदान करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. कोकणातील तिन्ही जिल्ह्यांत ९४१ मतदार आहेत. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत दोन्ही उमेदवारांना मिळणाऱ्या मतांमध्ये सिंधुदुर्गातील २१२ मतदार निर्णायक ठरणार आहेत.तटकरेंचा एकतर्फी विजयमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा एकतर्फी विजय निश्चित असून कोकणातून यापुढे शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही. विरोधकांनी केवळ त्यांना पडलेली मते मोजत रहावी.- नारायण राणे,स्वाभिमान पक्षाध्यक्षराणे राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदूस्वाभिमान पक्षाने दिलेल्या पाठिंब्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. मागील तिन्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीत राणेंच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत मिळाली होती. यंदाही विजय आमचाच असेल. नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू आहेत.- सुनील तटकरे,राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय सरचिटणीस
राणेंचा ‘स्वाभिमान’ राष्ट्रवादीसोबत! अनिकेत तटकरेंना पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 4:26 AM