कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून दुपारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
नारायण राणे यांच्याशी पवार यांची चर्चा सुरु असून राष्ट्रवादीशी राणेंचा स्वाभिमान पक्ष हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नारायण राणे हे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून गेले आहेत. मात्र, काही दिवसांपासून भाजपवर नाराज असल्याचे चिन्ह आहे. ही संधी पवार यांनी हेरली असून कोकणात नारायण राणे यांच्या साथीने पुन्हा सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे खाते उघडण्याच्या प्रयत्नात आहेत.
पवारांचे राणे कुटुंबीयांनी केले स्वागत केले. यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह नीलम राणे, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, प्रदेश चिटणीस व्हिक्टर डॉन्टस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चार वर्षांपूर्वी पवार केसरकरांच्या बंगल्यावर होते...
चार वर्षांपूर्वीच नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे हे खासदार होते. मात्र, सध्याचे शिवसेनेत असलेले राज्यमंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे तेव्हा राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गातील एकमेव आमदार होते. यावेळी राणे यांनी पवार यांची भेट घेत राष्ट्रवादीची ताकद निलेश राणे यांच्या पाठीशी देण्याची विनंती केली होती. यावेळी पवार यांनी केसरकर यांच्या घरी मुक्काम केला होता. मात्र, केसरकर यांनी याला विरोध करत शिवसेनेला मदत केली होती. यामुळे राणे यांना खासदारकी मोठ्या मतफरकाने गमवावी लागली होती.