नाशिकःभाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी आज नाशिकमध्ये आयटी परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'तुमचे अनेक मंत्री तुरुंगात जाण्यासाठी वेटिंगवर आहेत. तुमच्या काही नेत्यांनी पक्ष चालवण्यासाठी आमच्याशी चर्चा केली, अशी टीका त्यांनी केली.
'तुमचे नेते वेटिंगवर'यावेळी राणे म्हणाले की, तुम्ही आमच्यावर टीका काय करता, टोमणे काय मारता. राज्यातील बेरोजगारी कशी संपेल याबद्दल बोला. मराठी तरुण आज उध्वस्त होतोय. इथली मुले वसई विरारच्या पुढे गेले, तिथे मोठ्या इमारती झाल्या. तिथे यांची पार्टनरशीप आहे. पवारांच्या मेहेरबानीमुळे हे आज या खुर्चीत आहेत. तुमचे अनेक नेते तुरुंगात जाण्यासाठी वेटिंगवर आहेत, अशी टीका राणेंनी केली.
'मोदींवर टीका करण्यची तुमची लायकी नाही'राणे पुढे म्हणाले की, आधी एकत्र लढले आणि नंतर स्वार्थासाठी पळ काढला. जे पळून बाहेर पडले, ते आता पंतप्रधान मोदींवर बोलत आहेत. तुम्ही हिमालयाची उंची असलेल्या पंतप्रधानांवर टीका करत आहात, तुमची लायकी नाही त्यांच्यावर टीका करण्याची. कोकणात यांना एन्रॉन नको आहे, पण सगळे कॉन्ट्रॅक्टची कामे शिवसेनेच्या लोकांनी घेतली. आम्हाला विरोध केला, जमिनी शिवसैनिकांनी घेतल्या, याला शिवसेना म्हणतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
'मी कोणालाच नाही म्हणत नाही'ते म्हणतात की, देशातील सगळ्यात विकसित असलेले राज्य आज मागे पडले आहे. एकाही कामासाठी माझ्याकडे आले नाहीत. मी कधीच नाही म्हणत नाही, प्रत्येकाला हो म्हणायचे माझे काम आहे. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवायचे. अमेरिका, जापान, जर्मनी उद्योगात कितीतरी पुढे गेली. भारत महासत्ता बनावा ही मोदींची इच्छा आहे. मुकेश अंबानी माझे चांगले मित्र आहेत, ते अनेकांना रोजगार देतात. ते किती कमवतात हे बघू नका, किती जणांना रोजगार देतात हे महत्वाचे.