मुंबईः नारायण राणेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी राज्यपालांना भेटून केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राणेंवर जोरदार प्रहार केला आहे. काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा राणेंवर शरसंधान साधलं आहे. कोणी राज्यापालांना भेटलं म्हणून काय राष्ट्रपती राजवट लागू होते काय?, भाजपा असंतुष्ट असून, त्यांना सत्तेची लालसा आहे. त्यामुळे ते राज्यपालांना भेटत असतात. माजी मुख्यमंत्री नारायण राणे अस्वस्थ आहेत. भाजपची सत्ता येईल, मंत्रीपद मिळतील, अशी त्यांना आशा आहे. ती अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही. तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजणारी ही मंडळी असल्याचं टीकास्त्र बाळासाहेब थोरातांनी सोडलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र काम करतेय, चांगलं काम करतेय आणि पुढेही एकत्र काम करत राहणार आहोत. कोरोनाचं संकट आहे, त्या संकटाविरुद्ध आम्ही लढत आहोत. एकत्र पद्धतीनं लढतो आहोत. कोरोनाच्याविरोधात आम्ही काम करतोय, यात भेटीगाठी चालणार आहेत. आम्ही सतत संपर्कात सुद्धा आहोत. दिवसभरात अनेक वेळा आमचा फोनवरून संपर्क असतो.तिन्ही पक्षांचे नेते, मंत्री हे कोरोना कसा रोखता येईल, हे बघत आहेत. पवारसाहेब आमच्या आघाडीचे नेते आहेत. ते भेट घेऊ शकतात, त्यामागे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. आमचं सरकार स्थिर आहे, फक्त वातावरण निर्माण केलं जातं आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. विरोधी पक्षाने आमचं चुकत असेल तर दाखवून द्यावं, राजकारण करू नये, कोरोना संपला की राजकारण करू. त्यासाठी भरपूर वेळ आहे. पण राष्ट्रपती राजवट हा मुद्दा पुढे आणू नये, आता आम्हाला काम करू द्या, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
हेही वाचा
CoronaVirus News : धक्कादायक! उबर इंडियानं ६०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'
ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?
CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना