मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) आणि शिवसेना(Shivsena) यांच्या संघर्षात चर्चेत आलेले मंत्री अनिल परब चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यातील भाजपानं अनिल परब(Anil Parab) यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ईडीनं मंत्री अनिल परब यांना नोटीस पाठवली आहे. नारायण राणे यांच्या अटकेसाठी अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यानंतर ईडीनं पाठवलेल्या नोटिशीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
या नोटिशीनंतर मंत्री अनिल परब म्हणाले की, आज संध्याकाळी ईडीची नोटीस मिळाली. त्यात कुठल्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. केवळ ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता आमच्या कार्यालयात हजर व्हावं असं त्यात म्हटलं आहे. त्याव्यतिरिक्त नोटिशीत कुठलाही विशेष उल्लेख नाही. त्यामुळे नेमकी नोटीस कशाबाबत आहे हे सांगणं कठीण आहे. जोपर्यंत ती नोटीस कशाबद्दल आहे हे समजत नाही तोपर्यंत उत्तर देता येत नाही. नोटिशीत सविस्तर काय दिलं नाही. त्यात चौकशीचा भाग म्हणून उल्लेख आहे असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच आम्हाला याची अपेक्षा होती. आता कायदेशीर प्रक्रियेचा अभ्यास करून त्याचं उत्तर देईन. ईडीच्या नोटिशीवर कायदेशीवर बाबींचा अभ्यास करेन त्यानंतर ईडी कार्यालयात जायचं की नाही हे ठरवेन. कायदेशीर नोटीस आली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. त्यामुळे पुढं काय करायचं ते बघू असंही मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनिल परब मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहणार की नाही हे पाहणं गरजेचे आहे.
संजय राऊतांचा टोला
शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी ट्विटद्वारे सूचक विधान केले आहे. मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडल्यानंतर 'शाब्बास' अशी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जन आशीर्वाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परिवहन मंत्री अनिल परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत, असे सांगत कृपया chronology समजून घ्या असे सांगत रत्नागिरीत नारायण राणे यांना अटक केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे सूचक विधान राऊत यांनी केले आहे. मात्र, कायदेशीर लढाई कायदयानेच लढू असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा
अनिल परब यांच्या परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता. त्यामुळे ईडीकडून त्यांना काही प्रेमपत्र येणार नव्हते. नोटीसच येणार होती. आता पळपुटेपणा करू नये. ईडीच्यासमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचे सिद्ध करावे. संजय राऊत यांना काय वाटायचे ते वाटू दे. अनिल परब काही एकट्यासाठी पैसे जमा करायचे नाहीत. ते मातोश्रीचे परिवार मंत्री आहेत. थोडे परिवाराला द्यायचे आणि थोडे स्वत:ला ठेवयाचे हेच त्यांनी केले. त्यामुळे संजय राऊतांना काय बोलायचे ते बोलू द्या. अनिल परबांनी काय केले नसेल तर राऊतांना तमाशा करायची गरज नाही. त्यांना जाऊ द्या ना ईडीकडे. निर्दोष असतील तर काय घाबरायचे असं आमदार नितेश राणे(BJP Nitesh Rane) यांनी म्हटलं आहे.